आयफोनच्या उत्पादनात भारताचा वाटा   

वृत्तवेध

‘अ‍ॅपल’च्या भारतातील आयफोन उत्पादनात या आर्थिक वर्षाच्या अखेरीस लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार ‘अ‍ॅपल’ने मार्च २०२५ ला संपलेल्या आर्थिक वर्षात भारतात २२ अब्ज डॉलर किमतीच्या आयफोनचे उत्पादन केले. मागील वर्षाच्या तुलनेत ते ६० टक्के अधिक आहे. हे ‘अ‍ॅपल’च्या धोरणात्मक बदलाचे प्रतिबिंब असून आता पाचपैकी एक आयफोन भारतात बनवला जात आहे. पूर्वी बहुतेक उत्पादन चीनमध्ये केले जात होते. भारत १७.४ अब्ज डॉलर किमतीचे आयफोन निर्यात करतो. ही वाढ प्रामुख्याने चीनमधील कोविड लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळीत आलेल्या व्यत्ययांमुळे झाली आहे. ‘अ‍ॅपल’च्या चीनमधील सर्वात मोठ्या उत्पादन प्रकल्पांवर लॉकडाऊनचा गंभीर परिणाम झाला. त्यानंतर ‘अ‍ॅपल’ने आपल्या उत्पादन साखळीत बदल केले. भारतात ‘अ‍ॅपल’ची उत्पादनक्षमता वाढली आणि आयफोनच्या किमतीत कमालीची घट झाली आहे.
 
दक्षिण भारतातील ‘फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप’चा कारखाना आता भारतातील ‘आयफोन असेंब्ली’चा मोठा वाटा हाताळतो आणि ‘टाटा ग्रुप’च्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाने ‘विस्ट्रॉन’ आणि ‘पेगाट्रॉन’ विकत घेतले आहेत. ही कंपनी आता एक महत्त्वपूर्ण पुरवठादार म्हणून काम करत आहे. ‘अ‍ॅपल’ आता भारतात आपली उत्पादनक्षमता आणखी वाढवण्याचा विचार करत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्काची घोषणा केल्यानंतर भारतात उत्पादित आयफोनच्या शिपमेंटमध्ये वाढ झाली, असे अहवालात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, ट्रम्प प्रशासनाने ‘अ‍ॅपल’ला स्मार्टफोनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना शुल्कातून सूट दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. तथापि, ही सूट कायमस्वरूपी नाही आणि चीनमधून आयात केलेल्या वस्तूंवर २० टक्के शुल्काचा संभाव्य परिणाम ‘अ‍ॅपल’ला आपल्या पुरवठा साखळीत बदल करण्यास प्रवृत्त करू शकतो.
 
‘अ‍ॅपल’ आता आपली संपूर्ण आयफोन रेंज भारतात बनवत आहे. आता ‘अ‍ॅपल’च्या प्रीमियम टायटॅनियम प्रो मॉडेलसह संपूर्ण आयफोन श्रेणीचे उत्पादन भारतात केले जात आहे. भारताला ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवण्याच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून राज्य अनुदानदेखील एक आधार ठरत आहे. इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादनाला चालना देण्यासाठी मोदी सरकारने २.७ अब्ज डॉलरचे नवीन आर्थिक प्रोत्साहन जाहीर केले आहे. भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये सध्या ‘अ‍ॅपल’चा सुमारे आठ टक्के वाटा आहे आणि त्याची आयफोन विक्री आठ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ‘अ‍ॅपल’च्या या हालचालीमुळे भारताला स्मार्टफोन उत्पादन क्षेत्रात अधिक शक्तिशाली बनण्यास मदत होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. भारतात आयफोन उत्पादन वाढवण्याच्या दिशेने ‘अ‍ॅपल’साठी हे एक मोठे पाऊल ठरत आहे. 

Related Articles